प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – दुचाकीवरून मुलाला घेऊन चाललेल्या महिलेच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मुलाची आई गंभीर जखमी झाली असून, शिक्रापूर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावर ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेल्या हेमलता खरपुडे या सायंकाळच्या सुमारास एम एच १२ क्यू झेड ४२८४ या दुचाकीवरून त्यांचा मुलगा रुद्र याला घेऊन पाबळ चौकातून जुन्या पुलाकडे जात होत्या. मारुती मंदिर शेजारी नगरकडून आलेल्या एम एच १२ यु एस ८४९२ या ट्रॅक्टर व एम एच १२ ए एक्स ८११६ या ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात हेमलता सुनील खरपुडे (रा. करंजेनगर, शिक्रापूर) या जखमी झाल्या, तर रुद्र सुनील खरपुडे (वय १२) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या प्रकरणी संपत प्रकाश रासकर (वय ३८, रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे करत आहेत.