Share Market Fraud – शेअर मार्केटमधील गुंतवणूक, स्टॉक खरेदीच्या बहाण्याने सायबर ठगांनी तिघांना १ कोटी १९ लाख २१ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर ठगांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोरवाल रोड धानोरी येथील एका ५९ वर्षीय व्यक्तीने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. स्टॉक खरेदी आणि त्यावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगाने या व्यक्तीकडून ५० लाख रुपये उकळले आहेत, तर दुसऱ्या घटनेत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी येथील ४७ वर्षीय व्यक्तीकडून ४२ लाख ६६ हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत देखील केसनंद येथील ३४ वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केट गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने २६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक सायबर चोरट्यांनी केली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.