प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोन व्यक्तींची तब्बल ५९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वाकड येथे घडली.अक्षय दीपक पंजाबी (वय ३०, रा. वाकड) यांनी शनिवारी (दि. १३) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत बचुभाई मिस्त्री (वय ३९), रुपेश नारायण बारिया (वय ४१, रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचा मित्र देवानंद अजवानी यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगितले. त्यासाठी दोघांच्या नावे एंजिल वन कंपनीचे ५००० शेअर घेतो असे आरोपींनी सांगितले. फिर्यादी अक्षय आणि त्यांचा अमित्र देवानंद यांना आरोपींनी बनावट शेअर सर्टिफिकेट पाठवले. त्यांच्या नावे कोणतेही शेअर न घेता त्यांची ५९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.