बीड : बीड जिल्ह्यात ईव्हीएम स्ट्रॉंगरूमबाहेर निदर्शने करत निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शप) च्या एका उमेदवारासह इतर २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या इमारतीबाहेर घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम या इमारतीतील एका स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. बुधवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एक गट इमारतीच्या गेटसमोर बेकायदेशीरपणे जमला आणि त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले. सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने पोलिसांकडून त्यांना पांगण्याचे निर्देश देऊनही त्यांनी तेथून जाण्यास नकार दिल्याचे नाचन म्हणाले.