प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका खोलीत वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर पतीच आपल्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या दोघा पती-पत्नीला अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी एक व्यक्ती ग्राहकांकडून पैसे घेऊन एका महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते पती-पत्नी असल्याचे आणि पतीच पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली. याबाबत महिला पोलीस शिपाई दिक्षा विभिषण कांबळे यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पतीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे, तर पत्नीला महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.