प्रभात वृत्तसेवा पिंपरी – केवळ ५० रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १३ जानेवारी) रावेत परिसरातील एका चहा टपरीवर रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. विनोद ऊर्फ विन्या निजप्या गायकवाड (वय २७, रा. रमाबाई नगर, रावेत), अश्रय प्रभाकर साबळे (वय ३२, रा. काळभोर नगर, आकुर्डी, पुणे) व भूषण भोसले (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मयूर अशोक लोखंडे (वय ३०, रा. रुपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी, मूळ रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. १४) याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मयूर लोखंडे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. फिर्यादी हे चहा पिण्यासाठी रावेतमधील हॉटेलमध्ये बसले असताना आरोपी विनोद गायकवाड याने ‘तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे’ अशी मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चारचाकी वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास रावेत पोलीस ठाणे करीत आहे.