प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव एमआयडीसी परिसरातील चमाडिया गोडाऊन येथून तब्बल 68 लाख रुपयांची सिगारेट व इतर वस्तूंची चोरी झाल्याचा गुन्हा अवघ्या 72 तासांत उघडकीस आणण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून एक आरोपी अटकेत आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसीतील चमाडिया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीची सिगारेट, बिस्किटे आदी माल साठवून ट्रान्सपोर्टद्वारे डिलरकडे पाठवला जातो. मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या चार इलेक्ट्रिक पिकअप वाहनांमध्ये रात्रीच्या वेळी चलनासह माल भरून ठेवण्यात येतो. याच बाबीचा गैरफायदा घेत दि. 17 डिसेंबर रोजी पहाटे 6.40 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने माल भरलेले एक इलेक्ट्रिक पिकअप वाहन चालू करून गेटवर चलनाची नोंद करत 65 लाख 98 हजार 897 रुपये किमतीचा माल चोरून नेला. या प्रकरणी दीपक देवदास शिंदे (रा. लोणीकंद, मगरवस्ती, ता. हवेली) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर सिगारेट चोरी झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात चोरीस गेलेले पिकअप वाहन काही अंतरावर सोडून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यातून 54 लाख 53 हजार रुपये किमतीच्या सिगारेट दुसर्या वाहनातून हलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याच अनुषंगाने पोलीस अंमलदार उमेश कुतवळ यांनी वाघोली परिसरात संशयित वाहन शोधून काढले. कावेरी हॉटेल परिसरात तपासादरम्यान सदर वाहन सापडले. कौशल्यपूर्ण तपासात प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली, ता. हवेली) याने चोरीसाठी वाहन पुरविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक ज्ञानेश्वर ढेंरंगे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर शिक्रापूर, सिंहगड रोड व लोणीकंद पोलीस ठाण्यांत चोरीचे एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.