प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – कनेरसर (ता. खेड) येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री यमाई देवी मंदिरातील चोरीप्रकरणी दोषी ठरलेल्या अट्टल चोरट्यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि 3,000 रुपये दंड अशी शिक्षा राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. उतकर यांनी सुनावली आहे. दंड न भरल्यास अधिक 15 दिवसांची कैद भोगावी लागणार आहे. विनायक दामू जिते (वय 32, रा. कान्हुर मेसाई, ता. शिरूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्चना थोरात-चव्हाण यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कनेरसर येथील श्री यमाई देवीचे मंदिर हे नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सव तसेच वर्षभर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविक देवीच्या चरणी मौल्यवान दान अर्पण करतात. दि. 27 जुलै 2024 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून 400 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 22 हजार 400 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता. दुसर्या दिवशी सकाळी मंदिराचे पुजारी सिंधु महादू दमामे (वय 75) मंदिरात आल्यानंतर चोरी उघडकीस आली. त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी पारगाव (ता. आंबेगाव) येथील एका मंदिरातील चोरीप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी विनायक जिते याने कनेरसर येथील चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कान्हुर मेसाई येथील घराची झडती घेऊन चोरीस गेलेला चांदीचा मुखवटा व इतर मुद्देमाल जप्त केला. सहा साक्षीदार, ठोस पुरावे राजगुरुनगर न्यायालयात खटला चालू असताना सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्चना एस. थोरात-चव्हाण यांनी सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यात मंदिराचे पुजारी सिंधु दमामे यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. आरोपीची कबुली, मुद्देमालाची जप्ती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला.या प्रकरणात तपासी अंमलदार म्हणून एम. एम. कुडेकर, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार विजय चौधरी व रमेश जाधव यांनी कामकाज पाहिले. खेड तालुक्यात मंदिर चोरींचे वाढते प्रकार चिंतेचे खेड तालुक्यातील खरपुडी येथील खंडोबा मंदिरात दि. 5 डिसेंबर 2025 रोजी मोठी चोरी झाली होती. चोरट्यांनी गाभार्यातील 21 किलो चांदी व दानपेटी असा सुमारे 40 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून अद्याप त्याचा तपास सुरू आहे. तसेच राजगुरुनगर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या पांडवकालीन सिद्धेश्वर मंदिरातही यापूर्वी चोरीची घटना घडली होती. त्यामुळे देवस्थानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.