प्रभात वृत्तसेवा पुणे – बांगलादेशी तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. या वेळी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. बोपदेव घाट परिसरातील एका लाॅजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी लॅाजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा (४६, रा. येवलेवाडी, कोंढवा), कामगार सचिन प्रकाश काळे (४०) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलिसांचे पथक गस्त घालत असताना बोपदेव घाट परिसरातील एका लॉजमध्ये बांगलादेशी तरुणींना देहविक्रीय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करून लाॅजवर छापा टाकला असता, दोन बांगलादेशी तरुणी आढल्या. चौकशीत लॉजचा व्यवस्थापक गौडाने दलालामार्फत तरुणी आणल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तरुणींना ताब्यात घेण्यात आले.परिमंडळ पाचच्या प्रभारी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस कर्मचारी अमोल हिरवे, अरुण कीटे, सुषमा हिंगमिरे, सोनाली कांबळे, राहुल रासगे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. बांगलादेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना भारतात आणण्यात येते. त्यांना धमकावून देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले जाते. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे (ह्युमन ट्रॅफिकिंग) जाळे असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने कोंढवा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्धही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.