पुणे – पुणे जिल्ह्यात सध्या जमिनींचे दर गगनाला भिडले असून पीएमआरडीएच्या रिंग रोडचे काम सुरू असल्याने रिंग रोडलगतच्या जमिनींना मोठे बाजारमूल्य प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जमिनीच्या व्यवहारांत फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशाच एका गंभीर प्रकरणात मौजे बहुली, ता. हवेली, जि. पुणे येथील ज्येष्ठ नागरिक दांपत्याची जमीन फसवणुकीने बळकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे बहुली येथील ज्येष्ठ नागरिक विलास भगत व कमल विलास भगत यांची गावातील वडिलोपार्जित मालकीची शेतजमीन गट क्रमांक ३२८ व ४५४ अशी आहे. या जमिनीपैकी केवळ गट क्रमांक ४५४ मधील १७ गुंठे जमीन खरेदी करण्याचा व्यवहार ठरलेला असताना गावातीलच संतोष भगत व त्याचा साथीदार मयूर मारुती बदगुडे यांनी खोटी माहिती देत फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी टोकन म्हणून दिलेले ५ लाख रुपये हेच संपूर्ण व्यवहाराचा मोबदला असल्याचे खरेदीखत दस्तावेजात नमूद करून, कोणतीही स्पष्ट माहिती न देता घाईगडबडीने दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन दोन्ही गटांतील जमिनींचा खरेदीखत दस्त नोंदवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, सदर खरेदीखतामध्ये सरकारी मूल्यांकन देखील केवळ एका जमिनीचे दाखविण्यात आले असून, आरोपींनी संगनमताने शेतकऱ्यांची तसेच शासनाची मुद्रांक शुल्काचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, विलास भगत यांनी ॲड. नागेश जेधे व ॲड. ओंकार चव्हाण यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वकिलांमार्फत पोलिस उपायुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. तक्रार अर्जातील बाबींची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने उत्तम नगर पोलिस ठाण्यात आरोपी संतोष भगत व मयूर बदगुडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(५), ३१६(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तम नगर पोलीस करीत असून, वाढत्या जमीन व्यवहारांतील फसवणूक रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.