पुणे – डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख वाढवून कोंढवा परिसरात तरुणाला एकांतात बोलावून धारदार शस्त्राचा धाक दाखवत मोबाईल, दागिने आणि ऑनलाइन रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाने (२४) दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी असल्याने ता घरीच होता. सायंकाळी ग्राईंडर’ या डेटिंग अॅपवर ‘ टॉप’ नावाच्या आयडीवरून ओळख झालेल्या व्यक्तीने त्याला कोंढवा येथील कौसरबाग परिसरात ममता स्वीट्सजवळ भेटण्यास बोलावले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो त्या ठिकाणी पोहोचला असता, संबंधित व्यक्तीने शेजारच्या कच्च्या रस्त्याने आत येण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर तेथे कोणीही नसल्याचे लक्षात येताच पिडीताने पुन्हा फोन केला. पुढे येण्यास नकार दिल्यावर काही वेळात दोन तरुण त्याच्या जवळ आले. काही अंतरावर गेल्यानंतर तिसरा तरुणही त्यांच्यासोबत आला. तिघेही अंदाजे २० ते २२ वयोगटातील, सडपातळ आणि काळे-सावळे होते. तिघांनी धारदार शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी देत खाली बसण्यास सांगितले. आरोपींनी पिडीताकडील सॅमसंग गॅलेक्सी ए-३५ मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि यूपीआय आयडीचा पासवर्ड मागून घेतला. खात्यात पैसे नसल्याने त्यांनी घरच्यांकडून व मित्रांकडून पैसे मागविण्यास भाग पाडले. मित्राकडून ६ हजार व मामाकडून ४ हजार रुपये ऑनलाइन मागवून घेत आरोपींनी क्युआर कोडद्वारे एकूण १० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच चांदीचे दागिने आणि हेडफोनही त्यांनी लुटला. घटनेनंतर आरोपी मोबाईल व दागिने घेऊन पसार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या अशा गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.