प्रभात वृत्तसेवा पुणे – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यभर प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादनाविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई दोन जानेवारी रोजी करण्यात आली. यापूर्वी १ डिसेंबर २०२५ रोजी या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, या नमुन्यांमध्ये ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळले. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून, महाराष्ट्र सरकारने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ३१ कोटी ६७ लाख, २१,९८७ (३१.६७ कोटी) रुपयांचे विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा साठा जप्त करून कंपनीला सील ठोकले आहे. अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी (संचालक), फैजल फाजलानी (संचालक), मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. (कंपनी) या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या १९.४५ कोटींच्या कारवाईवरून पुणे एफडीएने ही मोठी साखळी उद्ध्वस्त केली आहे. पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. “राज्यात बंदी असलेली सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” – नरहरी झिरवळ, विशेष सहाय्य मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन