प्रभात वृत्तसेवा वाघोली – शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या बहाण्याने वाघोली येथील एकाची २७ लाख ९२ हजारांची तर कमोडीटी, सेंचुरी (ऑईल, फॉरेक्स, मेटल, क्रिप्टो) गुंतवणुकीत नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले असून याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पहिल्या प्रकरणात वाघोलीतील आयव्ही इस्टेट परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला गुगलवर मनी कंट्रोल पहिले. त्यानंतर त्यांना व्हॉटसॲप ग्रुपमध्ये ॲड केले. ग्रुपवर शेअर मार्केटची माहिती देऊन अप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. अपवर फायदा झाल्याचे दिसत असल्याने विश्वास ठेऊन वेळोवेळी २७ लाख ९२ हजार रुपये रुपये गुंतवले. ॲपवर सुमारे २ कोटी २० लाखांचा फायदा झाल्याचे भासविण्यात आले. पैसे काढण्यासाठी प्रयत्न केला असता आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात मांजरी खुर्द परिसरातील ४३ वर्षीय व्यक्तीला व्हाटसॲप मेसेज करून कमोडीटी, सेंचुरी मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळण्याचे आमिष दाखविले. व्यक्तीने मिळालेल्या लिंकद्वारे क्लिक करून डीटेल्स भरल्यानंतर ट्रेडिंग खाते तयार केले. एकाने व्यक्तीला कॉल करून बनावट फायद्याचे स्क्रीनशॉट पाठवून विश्वास संपादित केला. पैसे गुंतविल्यानंतर थोडा फायदा दिला. विश्वास बसल्याने व्यक्तीने विविध बँक खात्यात पैसे पाठवून ४६ लाख २२ हजार रुपये व्यक्तीने गुंतवले. त्याचे २ कोटी २० लाख फायदा झाल्याचे दिसत असताना पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. आणखी टॅक्सचे ३४ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.