प्रभात वृत्तसेवा पुणे – काळेपडळ परिसरातून तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करून फुरसुंगी येथील गणपती मंदीराच्या मोकळ्या जागेत दगड आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.प्रसाद विरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली परळी वैद्यनाथ, जि.बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, फुरसुंगी पोलिसांनी मुख्य आरोपी किरण भैरु चव्हाण (३२), रोहीत भरत गायकवाड (१८,रा. दोघे संतोषी माता कॉलनी लेन क्र.-३, ड्रीम ऑकृती काळेपडळ) या दोघांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रसाद याचा मित्र राहुल राजेंद्र सुतार (वय २५,रा. संतोषी माता कॉलनी, काळेपडळ) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.३०) दुपारी साडे चार ते साडे पाच वाजताच्या सुमारास घडला.फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की, किरण आणि प्रसाद यांच्यात दोन अडीच महिन्यापूर्वी वाद झाले होते. प्रसादने केलेल्या मारहाणीत किरणचा पाय मोडला होता. याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रसाद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसांपासून प्रसाद कोल्हापूर येथे राहत होता. कोर्टातील एका केसच्या अनुषंगाने तो पुण्यात आला होता. मंगळवारी दुपारी साडेचार वाजता किरण आणि त्याच्या तीन-चार साथीदारांनी प्रसाद याला संतोषीमाता कॉलनी काळेपडळ येथे गाठून बांबूने मारहाण केली. चारचाकी गाडीतून त्याचे अपहरण करीत फरसूंगी येथील संकेत विहार लेन क्र.-16 येथील गणपती मंदीराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत घेऊन आले. तेथे प्रसाद याच्या डोक्यात दगड घालून लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, याची माहिती फुरसुंगी पोलिसांना नियंत्रण कक्षाद्वारे मिळाली, त्यांनी घटनास्थळी जावून प्रसाद याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.