प्रभात वृत्तसेवा पुणे – पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना कात्रजमधील अंजनीनगर परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीनासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ऋषभ महेश सतवे (१७, रा. गंधर्व लॉनजवळ, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ऋषभ आणि एका अल्पवयीनामध्ये वाद झाला होता. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ऋषभ अंजनीनगर परिसरातून जात असताना संबंधित अल्पवयीन व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवले. त्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी ऋषभला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पसार झालेल्या अल्पवयीनासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत. तरुणाचे अपहरण करून खून दरम्यान, हडपसर परिसरात ३० डिसेंबर रोजी वैमनस्यातून एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रसाद वीरभद्र देवज्ञे (२१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी किरण भैरू चव्हाण (३२) आणि रोहित भरत गायकवाड (१८, दोघे रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.