प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबवेवाडी भागात सुशोभीकरणासाठी ठेवलेले पथदिवे, तसेच खांब चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. संत एकनाथनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता शिवानंद अंकोलीकर (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर परिसरात सुशोभीकरणासाठी पथदिवे बसविण्याचे काम सुरू असल्याने पदपथावर खांब आणि दिवे ठेवले होते. चोरट्यांनी पथदिवे आणि खांब असा दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पथदिवे आणि खांब चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेकडून तक्रार देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा शोध सुरू असून, पाेलिसांनी बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंदर रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.