प्रभात वृत्तसेवा पुणे – बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीमधील बंगल्यात चोरी केल्या प्रकरणी एकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.खम्मो वीरबहादूर शाही (वय ४०, ठाणे, मुळ रा.कोडनाली, नेपाळ) याला अटक झाली आहे. खेडेकर यांच्या घरी रविवारी (दि. ११) मध्यरात्री चोरी झाली होती. याबाबत चतु:शृंगी पोलिसांनी एका नोकरासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बंगल्यातील एका नोकराने मध्यरात्री पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले. त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर कपाटातून मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. ही बाब पूजा खेडकर यांनी पोलिसांना कळविली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता खेडकर दांपत्य त्यांच्या खोलीत पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. इतर खोलीत रखवालदार जितेंद्र सिंग, वाहनचालक दादासाहेब ढाकणे, स्वयंपाकी सुजित रॉय हेही बेशुद्धावस्थेत आढळले.अटक केलेल्या आरोपीच्या मुलावरही गुन्हा दाखल असून त्याला अटक करायची असल्याने शाही याला पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकील कल्पना झोरे यांनी केला.