Pune Crime: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या पेट्रोलिंगदरम्यान एका विधीसंघर्षीत बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तूल) जप्त करण्यात आला असून या प्रकरणी त्याच्यासह आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पथक बुधवारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना खबर मिळाली की, एक विधीसंघर्षीत बालक नवले पूलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत, राधाकृष्ण गार्डनसमोरील सेवा रस्त्यावर संशयास्पदरीत्या थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हा कट्टा त्याचा साथीदार सोमनाथ चांदणे याने दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा , अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेश बनसोडे उपआयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहीते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी सहभाग घेतला