Pune Crime News: कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री काही तरुणांच्या टोळक्याने केलेल्या दहशतीच्या प्रकारानंतर कोंढवा-येवलेवाडी पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करत परिसरात धाक निर्माण केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकींवरून आलेल्या सुमारे १२ जणांच्या टोळक्याने परिसरात बेफाम वाहन चालवत गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत मारहाण केली. या घटनेत बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्यावर कमरेच्या पट्ट्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर समोरून येणाऱ्या सायपन शेख (वय १८) या तरुणालाही आरोपींनी मारहाण केली. सायपन हा कुरिअर सेवेत कार्यरत असून त्याच्या छातीवर जोरदार प्रहार करण्यात आला. घटनेनंतर मयूर गायकवाड यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी दुचाकींवरून पसार झाले. Pune Crime News: गाड्यांची तोडफोड, नागरिकांना शिवीगाळ मारहाणीनंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी गल्ली क्रमांक ११ मधील पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. आरोपींची ओळख पटली या प्रकरणात तक्रारदार आणि स्थानिकांच्या मदतीने काही संशयितांची ओळख पटली असून त्यात ओंकार पांचाळ, सोन्या जाधव, हर्षल, अभि दीक्षित, प्रसाद शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी कोंढवा बुद्रुक परिसरातीलच रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांची धडक कारवाई या घटनेची गंभीर दखल घेत कोंढवा-येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. संशयित गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. Pune Crime News पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून परिसरात कायद्याचा धाक निर्माण केला जाईल. हेही वाचा: Dhurandhar 2: ‘धुरंधर २’वर अभिनेत्री राम्याचा संताप; दिग्दर्शकावर प्रोपेगंडाचा आरोप