प्रभात वृत्तसेवा पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात टोळक्याने तब्बल १५ वाहनांची तोडफोड केली आहे. बुधवारी (दि. २१) मध्यरात्री अडीच वाजता खंडाळे चौकात ही घटना घडली. किरकोळ कारणावरून टोळक्याने तरुणाला मारहाण केल्यावर बांबू, कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रारदार तरूण क्रिस चव्हाणचा काही दिवसांपासून आरोपीशी वाद होता. त्यातून टोळक्याने बुधवारी क्रिसला अडवले. तेथे बाचाबाची झाल्यानंतर क्रिसने पळण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करताना टोळक्याने दिसेल त्या वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. आवाजामुळे जाग आलेल्या नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तोडफोड प्रकरणी दिपक कदमला ताब्यात घेतले. महापालिका निवडणुकीत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी सलग दोन दिवस मोठा जमाव जमा केला होता. त्यामुळे येथे राजकीय वातावरण गरम झाले होते.पद्मावती परिसरात दुसऱ्यांदा वाहन तोडफोडीच्या घटना घडली आहेत. अशीच घटना मे २०२५ मध्ये तळजाई वसाहतीत घडली होती. अल्पवयीन टोळक्याने दहशत माजवण्यासाठी चार वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.वाहन तोडफोडीमुळे रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी पेट्रोलिंग वाढविणे, गुन्हेगारांवर कारवाई करणे, सराईतांची कुंडली तपासण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.