प्रभात वृत्तसेवा पुणे – भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात बंदोबस्तास असलेल्या पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी उमेदवाराच्या भावाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ही घटना घडली.याप्रकरणी एका पोलीस निरीक्षक महिलेने खडक पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शैलेंद्र देवीदास किराड (रा. पद्जी पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी किराड याच्या भावाला एका पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २२, २३, २४ मधील उमेदवारी अर्ज दाखल करणे, तसेच अन्य कामकाज केले जाते. शुक्रवारी (२ जानेवारी) अर्ज माघारी घेण्याची मुदतीवेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात बंदोबस्त ठेवला होता. त्या वेळी प्रवेशद्वारावर बंदोबस्तास असलेल्या पोलीस निरीक्षक महिला, तसेच कर्मचाऱ्यांना आरोपीने प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले. पोलिसांनी नकार दिल्यानंतर आरोपीने गोंधळ घालून पोलीस निरीक्षक महिलेला शिवीगाळ केली. विनयभंग, तसेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.