प्रभात वृत्तसेवा पुणे – हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रुग्णालयातील अधिकारी अभिजित अंकुश शिवणकर (४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय केरू सपकाळ, शुभम संजय सपकाळ, कुणाल हनुमंत सकपाळ, गौरव गणेश सकपाळ, विश्वजित कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव हनुमंत सपकाळ, विनायक अजय सपकाळ (सर्व रा. उद्योगनगर, महंमदवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेची हानी किंवा नुकसान) यांना प्रतिबंध कायदा -२०१० कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात केरू सपकाळ यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डाॅक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे सपकाळ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. सपकाळ यांचा मुलगा याने अन्य आरोपींना चिथावणी दिली आणि त्यानंतर रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. शिवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार पुढील तपास करीत आहेत.