प्रबभात वृत्तसेवा पुणे – भूसंपादन प्रकरणातील निकालाची प्रत देण्यासाठी शेतकऱ्याकडे लाखाची लाच मागितल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुनंदा अशोक वागसकर (येवले) या निवृत्त महिला मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. याप्रकरणी बंडगार्डन ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार शेतकरी असून त्यांच्या ६२ वर्षांच्या मामे बहिणीच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपपत्र नोंदीसंबंधीचा दावा उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभागाकडे दाखल आहे. याची सुनावणी पूर्ण झाली असून, निकालाची प्रत देण्यासाठी वागसकर यांनी लाचेची मागणी केली. सुरुवातीला ५० हजारांची मागणी केली होती. पडताळणी दरम्यान इतरांच्या नावे एक लाखांची लाच मागितली. एसीबी पथकाने वागसकर यांना ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.