प्रभात वृत्तसेवा पुणे – भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी जीपचालकाला अटक केली आहे. प्रतिभा दत्तात्रय घडशी (५५, रा. धबाडी, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार महिला मंगला अशोक काकडे (६०, रा. श्री दत्त संस्कृती रेसीडन्सी, धबाडी) जखमी झाल्या. याप्रकरणी जीपचालक राजकुमार ज्ञानेबा राजपंगे (३८, रा. श्री भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी मंगला काकडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंगला काकडे आणि त्यांची मैत्रीण प्रतिभा या वडगाव बुद्रुकमधील धबाडी रस्त्याने सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निघाल्या होत्या. चरवड बंगल्यासमोर भरधाव जीपने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी घडशी यांना गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या घडशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत.