प्रभात वृत्तसेवा पुणे : अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि अद्यापही अपूर्ण असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याने सोमवारी आणखी एक निष्पाप बळी घेतला. इस्कॉन मंदिराजवळ काम सुरू असलेल्या रस्त्यावर दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. रमा प्रसाद कपाडी (५२, रा. कात्रज–कोंढवा रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या महमंदवाडी येथील एका शाळेत को-ऑर्डिनेटर म्हणून काम करत होत्या. त्या शाळेत जातानाच हा अपघात झाला.पोलिसांच्या माहितीनुसार खडीमशीन चौकाकडून रमा या कात्रजच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना त्या मोठ्या कंटेनरच्या चाकाखाली आल्या. दुचाकी कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडली. यामध्ये तिचे दोन्ही पाय ट्रकखाली आले. यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यावेळी वाहतूक कोंडीमुळे मदत लवकर मिळू शकली नाही. नागरिकांनी रिक्षातून त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.अपूर्ण रस्ता, अरुंद मार्ग, कामामुळे निर्माण झालेली वळणे, आणि प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे हा अपघात घडला. रमा यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या आई आणि मुलीसोबत राहत होत्या. आईचा आधार अचानक हरपल्याने आता मुलीला मोठा धक्का बसला आहे. आई कमावती असल्याने मुलीपुढे आता उदरनिर्वाहाचा आणि शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ५५ अपघात, २५ मृत्यू कात्रज–कोंढवा या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर मागील साडेचार वर्षांत ५५ हून अधिक अपघात झाले. यामध्ये तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम वर्षानुवर्षे सुरू असून अद्याप पूर्ण झाले नसल्याने हा मार्ग अपघातप्रवण ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी किती बळी जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.