प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल जयश्री रेस्ट्रो, बार आणि लॉजिंग येथे खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि. 19) दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. हॉटेलमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून, काही महिलांची सुटका करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित व्यवस्थापक व इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, या छाप्यात नेमकी किती महिलांची सुटका झाली व किती जणांवर कारवाई करण्यात आली, याबाबतची अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.