प्रभात वृत्तसेवा पिंपरी – अवघ्या २० महिन्यांत रक्कम दामदुपट करून देतो, असे आमिष दाखवून एका रिक्षा चालकाची २० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना भोसरी परिसरातील हॉटेल समाधान, फुगे प्रायमा येथे ०९ डिसेंबर २०२२ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली.संतोष बाळकृष्ण तरटे (वय ४३, रा. नखाते चौक, रहाटणी. मुळ रा. गायकवाड चाळ, पंचशीलनगर, औंध कॅम्प, पिंपळे निलख) यांनी मंगळवारी (दि. २५) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रमोद रविंद्र चिंतामणी (वय ३५, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, विधी रोड, भोसरी, पुणे), संदीप बाळू आहेर (वय ४५, रा. दिघीरोड, भोसरी) आणि गौरक्ष प्रकाश मैड (वय ३८, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिंतामणी, आहेर आणि मैड यांनी फिर्यादी तरटे यांचा विश्वास संपादन करून “२० महिन्यात दामदुप्पट परतावा” देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादीकडून १५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे आणि तीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. विश्वासार्हतेसाठी आरोपींकडून बनावट सही असलेले चेक व उसनवारी करारनामा देण्यात आला. परंतु परतावा न देता आरोपींनी केवळ १५ लाख ६० हजार रुपये परत केले व उर्वरित २० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली.