निगडी बसस्थानक परिसरात वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणाऱ्या सराईत महिलांना पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर पकडले. Pimpri Crime: महिल्यांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या सराईत महिलांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने ही कामगिरी केली असून आरोपींकडून सोन्याचे दागिने व स्पोर्ट बाईक असा सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिलांची ही टोळी राज्यभरात फिरुन चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे. निगडी बसस्थानक, मधुकर पवळे उड्डाणपूल परिसरात तीन महिला वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन तिथून पळून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हालवत या महिलांना ताब्यात घेतले.तपासामध्ये या महिलांवर अफजलपुर, गुलबर्गा, विजयपुरा, राज्य कर्नाटक तसेच बाद्रा, परभणी, दादर, कुर्ला, महाराष्ट्र येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. तपासात चोरीस मदत करणाऱ्या आणखी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असून तिच्याकडून घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, मोटारसायकल चोरी प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे व सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक पोलीस उप निरिक्षक सुर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, पोलीस शिपाई सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उध्दव खेडकर, दिपक तांदळे, केशव चेपटे यांनी केली आहे.