Pimpri Crime – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून तरुणावर व त्याच्या तीन नातेवाइकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रामनगर, चिंचवड येथील गोल्डन चौक परिसरात बुधवारी (दि. 21 जानेवारी) रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.या प्रकरणी चेतन सूर्यकांत पात्रे (वय 21, रा. विद्यानगर, चिंचवड), लक्ष्या कांबळे, करण देडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लक्ष्या कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. साबिरअली मुजीबुल रेहमान मनिहार (वय 18, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. 22) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आपल्या काकांसाठी औषध घेऊन येत असताना आरोपींनी फिर्यादी साबिरअली यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने पायावर मारहाण करण्यात आली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी, त्यांचे काका दोन चुलतभाऊ आले असताना आरोपींनी शिवीगाळ करीत फिर्यादीच्या काका व दोन चुलत भावांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तपास पिंपरी पोलीस ठाणे करीत आहे.