प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपच्या माजी नगरसेविका तसेच भाजपाच्या उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून घरातील सदस्यांना धमकावल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 15 जानेवारी) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली. सुजाता सुनील पालांडे (वय 57, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश खत्री, रवी खत्री, हरपित सिंग भात्तोय, जब्बलसिंग उर्फ संदीप, मनीष व्होरा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 329, 115 (2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता लांडे यांच्या घरात आरोपींनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्यांची आई आणि इतर पाहुणे तसेच घरातील सदस्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. घरामध्ये दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या घटनेनंतर संत तुकाराम नगर परिसरात मोठा राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. भाजप कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.