प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रस्ता ओलांडणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तीला भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने हा भीषण अपघात घडला. ही घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) रात्री सांगवी जवळील औंध हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्यावर घडली.या प्रकरणी अबरार एजाज बागवान (वय २८, रा. पिंपळे निलख) यांनी रविवारी (दि. ४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक आयान हसनअली मेघानी (वय २१, रा. बोट क्लब रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील एजाज इब्राहिम बागवान हे रस्ता ओलांडत असताना आरोपीने आपली कार अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.