प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील ट्रेलरने स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १३ जानेवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास निगडीतील थरमॅक्स चौकात घडली.आशा श्रीकांत लोखंडे (वय ३१) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सुशिला वामन घोडके (वय ४५, रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी) यांनी मंगळवारी (दि. १३) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात ट्रेलर चालक नुर इस्लाम गुमाणी (वय ४२, रा. सध्या कळंबोली, जि. रायगड; मूळ रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्कूटीवरून निगडीकडे येत असताना थरमॅक्य चौकाच्या पुढे आल्यावर भरधाव वेगातील ट्रेलरने फिर्यादी सुशिला यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मागे बसलेल्या आशा लोखंडे या महिलेच्या अंगावर ट्रेलरचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणाचा तपास निगडी पोलीस ठाणे करीत आहे.