प्रभात वृत्तसेवा जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथील भागडी रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून, ही घटना रविवारी (दि. २१) संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल संदीप इचके (वय २३) आणि त्याचा मित्र आकाश वसंत इचके (दोघे रा. कवठे येमाई, ता. शिरूर) हे आपल्या दुचाकीवरून भागडी-पिंपरखेड रस्त्याने जात होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास दाभाडेवस्ती परिसरात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, निखिल इचके याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आकाश इचके हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.याप्रकरणी निखिलचे मामा बबन लक्ष्मण कोरके (रा. सविंदणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, शिरूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.