PCMC Scam – महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या अनामत रक्कम आणि भाडे वसुलीत अपहार झाला आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागातील तब्बल १५ कर्मचाऱ्याच्या कालावधीत सुमारे ५० लाख ७० हजार ६२६ रुपयाचा अपहार झाला आहे. प्रेक्षागृह हे भाड्याने देताना अनामत रक्कमा न घेणे, भाडे वसुलीची परस्पर विल्हेवाट लावणे, इतर साहित्य, साधन सामुग्रीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाच नाट्यगृहे, प्रेक्षागृह आहेत. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सन २०१८ ते २०२३-२४ या कालावधीत क्रीडा विभागाकडून लिपिक, मुख्यलिपिक हे कार्यरत होते. तसेच व्यवस्थापक म्हणून नाट्यगृहाची जबाबदारी काही कर्मचाऱ्यावर देण्यात आली होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी त्याच्या कार्यकाळात झालेले कार्यक्रम व रक्कम किती जमा झाली आहे, याचा हिशेबच ठेवलेला नाही. हा प्रकार तब्बल सहा वर्षे सुरू होता. काही कर्मचाऱ्यांनी ही रक्कम महापालिकेत जमा न करता थेट स्वतःच्या खिशात घातली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या क्रीडा विभागाने संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागाकडे कामकाज आल्यानंतर दप्तर तपासणीत झालेले कार्यक्रम आणि प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम यात तफावत आढळून आली. नंतर अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे कार्यक्रमाच्या भाड्यापोटी जमा झालेली लाखो रुपये रक्कम तिजोरीत भरली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत क्रीडा विभागाच्या उपलेखापालांकडून प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये मोरे प्रेक्षागृहात गैरप्रकार झाल्याचे नमूद करून तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेच्या क्रिडा विभागातीव अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात महापालिकेच्या क्रीडा विभागाने अहवाल तयार करून प्रकरण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी प्रशासनाकडे पाठविले आहे. या प्रकरणात सुमारे २० लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकारामुळे महापालिकेतील अनागोंदी कारभार उघड झाला. कर्मचाऱ्यांनी हे कारनामे करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशिर्वाद घेऊनच केले होते. त्यानूसार रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील प्रकरणात संबंधित लिपिकासह मुख्य लिपिक, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. त्यानूसार तब्बल १५ जणावर ठपका ठेवून ४२ लाख ६८ हजार २१५ वसुलपात्र आणि ८ लाख ३ हजार ४११ रुपये एवढी आक्षेपाधिन ठेवली आहे. “प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याने मोरे प्रेक्षागृहाचे सन २०१८ ते २०२३-२४ पर्यंत कालावधीचे लेखापरिक्षण करण्यात आले. त्यात १५ जणावर कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. त्या सर्वांची चौकशी करून अंतिम अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.” – मनोज लोणकर, सह आयुक्त. प्रशासन विभाग.