प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात अल्पवयीन महाविद्यालयीन आदिवासी मुलीची छेडछाड झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असून, ती दररोज वाफगाव–राजगुरुनगर एस.टी. बसने महाविद्यालयात ये-जा करते. तिच्या वस्तीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या खडी क्रशर प्लांटवर बाहेर राज्यातील कामगार कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यातील एक कामगार तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. गुरुवारी (दि. १) सकाळी सुमारे १०.३० वाजता ठाकरवाडी फाटा येथील बसथांब्यावर पीडित मुलगी व तिची चुलत बहीण बसची वाट पाहत असताना आरोपी अजय शामलाल पाल (वय २३, रा. मुंडडा, पोस्ट सैयदराजा, ता. सादराजा, जि. चंदौली, उत्तर प्रदेश) याने तिच्याशी हिंदी भाषेत बोलत वहि व पेन मागितले. त्यानंतर त्याने वहित आक्षेपार्ह मजकूर लिहून मोबाइल क्रमांक देत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच मुलीने संबंधित कागद फाडून टाकत तात्काळ नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. यानंतर संध्याकाळी कुटुंबीय आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर दबाव आणण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी एका व्यक्तीने हत्यारासह धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. याबाबत तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी अजय पाल याला ताब्यात घेतले. खेड पोलिसांनी आरोपीविरोधात अल्पवयीन मुलीची छेडछाड, धमकावणे तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बाहेर राज्यातून आलेल्या कामगारांच्या वर्तणुकीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.