प्रभात वृत्तसेवा वाघोली – शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चारशे ते हजार टक्के परतावा व चांगल्या नफ्याचे आमिषाने वाघोली येथील 42 वर्षीय व्यक्तीची 10 लाख 68 हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील आयव्ही ईस्टेट परिसरातील 42 वर्षीय व्यक्तीला व्हॉटसअॅपवर ट्रेडिंग विषयी मेसेज पाठवून ग्रुपमध्ये व्हाटसअप ग्रुपमध्ये अड करण्यात आले. ग्रुपवर शेअर ट्रेडिंग बाबत फायद्याची माहिती देऊन व्यक्तीला लिंक पाठवून अप डाऊनलोड करण्यात सांगण्यात आले. त्यानंतर व्यक्तीने अपवर रजिस्ट्रेशन करून थोडे पैसे गुंतविले. अपवर फायदा झाल्याचे दिसत असल्याने वेळोवेळी 10 लाख 68 हजार रुपये विविध बँक खात्यात पाठविले. गुंतविलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता निघाले नाही. फिर्यादीला ग्रुप मधून बाहेर काढण्यात आले. भरलेले पैसे परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात कळवून वाघोली पोलिसात फिर्याद दिली.