Navale Bridge Accident – नवले पूल परिसरात शुक्रवारी (दि. १३ मार्च) सकाळी पुन्हा भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर पाच चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. अशफाक हनिफ चौधरी( ३६ ,रा.कोंढवा) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाला नवले पुलाखालील चौकात सिग्नलमुळे वाहने थांबली होती. याचवेळी कात्रज बोगद्याकडून उतारावरून वेगात येणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तीव्र उतारामुळे ट्रकचा वेग वाढला आणि त्याने सिग्नलवरील दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकने पुढील पाच चारचाकी वाहनांना एकामागोमाग एक धडक दिली. या धडकेत वाहनांचा चक्काचूर झाला आहे. ट्रक्रच्या चाकाखाली दुचाकीस्वाराच्या मृतदेहाचे काही भाग अडकले होते. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर वाहनांचे अवशेष पडले होते. मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. नऱ्हे, सिंहगड पलिसांनी घटनास्थळास भेट दिली. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यावर वाहतूक सुरळीत झाली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याची माहिती नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी दिली. अपघात टाळण्यासाठी हवा उन्नत पूल नवले पूल– नवीन कात्रज बोगदा हा सात किलोमीटरचा तीव्र उताराचा पट्टा असल्याने येथे वारंवार गंभीर अपघात घडतात. अवजड वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जाणे, ब्रेक निकामी होणे आणि वाहतुकीची मोठी गर्दी यामुळे येथे अनेकदा दुर्घटना घडतात.यापूर्वीही १३ नोव्हेंबर रोजी याच परिसरात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने १० ते १२ वाहनांना धडक बसून लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. प्रशासनाने वेगमर्यादा, चेतावणी फलक, वाहतूक नियंत्रणासारख्या उपाययोजना केल्या असल्या तरी अपघातांची मालिका थांबत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. नऱ्हे ते रावेत (सुतारवाडीमार्गे) दरम्यान उन्नत पुलाचा प्रकल्प मंजूर झाला असून या प्रकल्पामुळे मार्गावरील वाहतूक व अपघातांचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.