प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा सरकारी जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणी अटक झालेल्या शीतल तेजवाणीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी तेजवाणीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तेजवाणीने २००६ ते २००८ दरम्या जमिनीच्या मुळ वतनदारांच्या वारसांशी विकसन करारनामा केला होता. त्यानुसार विकसन मोबदल्याची किंमत प्रती एकर ४० लाख ठरली होती. विकसन करारनाम्यात अल्प रक्कम वतनदारांना दिल्याचे तपासातून पुढे आले. या प्रकरणी तीन तासांहून अधिक काळा युक्तीवाद झाला.तेजवाणी (वय ४४ वर्षे, मुळ रा. नरिमन पॉइंट, मुंबई, सध्या राहणार बी ९०१, ऑक्सफर्ड हॉलमार्क, लेन नंबर ७, कोरेगाव पार्क) हिला गुरुवारी (ता. ४) न्यायालयात हजर केले. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर एक गुन्हा नोंद झाला. व्यवहाराची रक्कम तेजवाणीने घेतली का, घेतल्यास कशी घेतली याचा तपास करायचा असल्याने १४ दिवसांची पोलिस कोठडी सरकारी वकील अमित जाधव यांनी मागितली होती. खरेदीखतात तेजवानी व अमेडियाचा मालक असल्याचा उल्लेख दिशाभूल करणारा आहे. मिळकत १२०० कोटींपेक्षा जास्त किमतीची असताना ३०० कोटीस दाखविण्याचा उद्देश काय होता, याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली.