प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीच्या बँक खात्यांत ३०० कोटी रुपयांच्या व्यवहारांचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. ही रक्कम तिने रोख घेतली, की नेमका कोणत्या माध्यमातून व्यवहार झाला, याबाबत ती पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. तिचा ‘अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीशी संपर्क कसा आला, कोणाच्या ओळखीने व्यवहार केला, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. ११) न्यायालयात दिली.तेजवानी (४४, मूळ पत्ता ३०५, तृतीय मजला, तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई. सध्या बी-९०१, ऑक्सफर्ड हॉलमार्क, कोरेगाव पार्क) हिला आर्थिक गुन्हे शाखेने ३ डिसेंबरला अटक केली. पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने तिला गुरुवारी न्यायालयात हजर केले. जमिनीच्या कब्जा हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेला ११ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कोणाच्या सांगण्यावरून भरला, याबाबत ती अद्याप माहिती देत नाही. तिच्या घरझडतीतही कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे सापडलेली नाहीत. त्यामुळे तिची इतरत्र मालमत्ता, घर किंवा कार्यालय असण्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली. याशिवाय तिच्या दोन मोबाइल क्रमांकापैकी एक क्रमांक इतर एका महिलेच्या नावावर असल्याचेही तपासात उघड झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी न्यायालयात मांडली. कोठडी १५ डिसेंबरपर्यंत वाढ तेजवानीच्या ताब्यातून २००६ मधील ३३ नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्रे आणि २००८ मधील ४५ रिव्होकेबल कुलमुखत्यारपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. २००६ मधील दस्तावेजांमध्ये वतनदारांच्या १४४ वारसांची नावे, तर २००८ मधील दस्तावेजांमध्ये २३९ वारसांची नावे आहेत. तिच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये एकूण २७२ वारसांच्या वतीने ती कुलमुखत्यार म्हणून व्यवहार करत असल्याचे दिसून येते. मात्र, २७२ वारसांपैकी सर्वांची कुलमुखत्यारपत्रे तिच्याकडे आढळली नाहीत. बाकीचे दस्तऐवज कुठे आहेत, याच्या तपासासाठी तिच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांनी वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अमित यादव यांनी केला. बचाव पक्षाकडून ॲड. प्रवण पाटील यांनी युक्तिवाद केला.