प्रभात वृत्तसेवा पुणे – मुंढवा येथील ४० एकर सरकारी जमिनीच्या बेकायदा खरेदी- विक्री प्रकरणातील ३०० कोटी रुपयांचा व्यवहार आणि अन्य व्यक्तींच्या सहभागाबाबत पोलीस कोठडीत शीतल तेजवानीकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्या माहिती देत नसल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, तेजवानीने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, त्यावर १९ डिसेंबरला तपास अधिकारी म्हणणे सादर करणार आहेत.मुंढवा येथील भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मालकीची ४० एकर जमीन परस्पर पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीला विकल्याप्रकरणी कथित कुलमुखत्यार शीतल किसनचंद तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील, तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले आदी आरोपींविरोधात खडक पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटक आरोपी शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला सोमवारी (दि. १५) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक दत्तात्रेय वाघमारे यांनी गुन्ह्याच्या तपासातील प्रगती न्यायालयासमोर सादर केली. तेजवानी तपासास सहकार्य करत नसल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. बावधन पोलिसांचा ताब्यासाठी अर्ज दरम्यान, मुंढवा येथील सरकारी जमीन अमेडिया कंपनीला विकताना ६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तेजवानीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.