प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्यातील अँम्बी व्हॅली सिटी परिसरात एका महिलेस अश्लील शब्दांनी अपमानित करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी भरतकुमार ए. जैन (रा. फ्लॅट क्र. 601, सहावा मजला, प्लॉट क्र. 326, देवरे हाऊस, भवानी शंकर रोड, कबुतरखाना, दादर पश्चिम, मुंबई) याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 ते जुलै 2025 या कालावधीत पेठशहापूर (ता. मुळशी) हद्दीतील अँम्बी व्हॅली सिटी येथील वेस्ट लेक परिसरात आरोपीने संबंधित महिलेकडे एकटक पाहत अश्लील शेरेबाजी केली. तसेच प्रकल्पाच्या पार्किंग परिसरात तिच्या जवळ जाऊन गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संबंधित महिलेस मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर तिने पौड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध विनयभंग व अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार नरेश येमुल करीत आहेत.