Mulshi Accident – मुळशी तालुक्यातील कातरखडक येथील भैरवनाथवाडीमध्ये भरधाव डम्पर घरात घुसल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संपत जगन्नाथ मालपोटे (वय ३४, रा. भैरवनाथवाडी कातरखडक) यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. १७ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आंधळे ते रिहे मार्गालगत ही दुर्घटना घडली. डम्पर क्रमांक MH04LE8603 वरील चालक (नाव व पत्ता अज्ञात) हा डम्पर भरधाव वेगात चालवत होता. रस्त्याच्या वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डम्पर थेट रस्त्यालगत अंदाजे दहा फूट अंतरावर असलेल्या मालपोटे यांच्या घरात शिरला. त्यावेळी घरात झोपलेल्या नंदाबाई जगन्नाथ मालपोटे (वय ५०) यांच्यावर घराची भिंत कोसळून त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जगन्नाथ मालपोटे, कांचन संपत मालपोटे व कैवल्य संपत मालपोटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार महेश पवार, विराज कामठे, ईश्वर काळे, दिलीप सुपे, गौतम लोकरे आबा सोनवणे, राजेश गायकवाड, गायकवाड, गणेश पवार घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण करीत आहेत.