प्रभात वृत्तसेवा पुणे – नगरपरिषद निवडणुकची तयारी सुरू असताना फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. दोघांविरुद्ध फुरसुंगी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने सोमवारी (दि.१५) रात्री ही कारवाई केली. यावेळी मद्याच्या बाटल्यासह मोटार असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. वेदांत कामठे हा फुरसंगी-उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार राहुल यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस असून त्यांचे पथक आचारसंहिता पालन, उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम करते. सोमवारी रात्री फुरसुंगी परिसरात तपासणी नाक्यावर गवळी नियुक्तीस होते. फुरसुंगीकडे येणारी भरधाव मोटार नाक्यावर थांबविण्यात आले. तपासणीत मद्याच्या बाटल्या सापडल्या. याबाबत विचारणा केली तेव्हा समाधानकारक उत्तरे देता आली नाही.याची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पाेहोचले. मोटारीसह मद्याच्या बाटल्या जप्त केल्याची माहिती फुरसुंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली