प्रभात वृत्तसेवा ओझर – निमगिरी (ता. जुन्नर) येथे झालेल्या एका निर्घृण खून प्रकरणातील फरार आरोपीला वारजे पोलीस पथकाने अटक केली आहे. घर आणि जमिनीच्या वादातून ५ जानेवारी रोजी एका महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पसार झालेला आरोपी तुषार निंबा साबळे याला वारजे परिसरातून ताब्यात घेऊन जुन्नर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणातील फिर्यादी शरद निंबा साबळे (वय ४२, रा. निमगिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरासमोर आरोपी तुषार साबळे याने शरद यांच्या पत्नी अरुणा शरद साबळे (वय ३८) यांच्यावर चाकूने छातीवर व हातावर वार केले होते. या हल्ल्यात अरुणा यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जुन्नर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता.आरोपी तुषार साबळे हा वारजे येथील यशोदीप चौक परिसरात आल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. ही माहिती जुन्नर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांचे पथक तातडीने पुण्यात दाखल झाले आणि आरोपीचा ताबा घेतला. या आरोपीला उद्या जुन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पीएसआय सिद्धेश्वर रायगोंडा, पीएसआय नायकवडे आणि कॉन्स्टेबल चौधरी यांच्या पथकाने केली.