प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळील एका हाॅटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून लोणी काळभोर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. कारवाईत पोलीसांनी रोख रकमेसह ८४४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी हॉटेलचा व्यवस्थापक मोहन कसनु राठोड (वय. ५०, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली) व गणेश दत्ता चिलकेवार (वय. २५, रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हाॅटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालतो, अशी माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली होती. माहितीची खात्री पटवण्यासाठी पोलीसांनी एक बनावट ग्राहक हाॅटेलमध्ये पाठवले होते. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. मोहन राठोड व गणेश चिलकेवार या दोघांना ताब्यात घेऊन दोन पीडित महिलांची पोलीसांनी सुटका केली. दोघांविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, हवालदार अण्णा माने, सागर जगदाळे, महिला पोलीस वनिता यादव, सचिन सोनावणे, चेतन कुंभार, मल्हार ढमढेरे यांनी केली आहे.