पुणे – कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पळालेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांनी हा निर्णय सुनावला. किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्यानंतर घायवळ परदेशात पळून गेला होता. ब्रिटन उच्चायुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सध्या ९० दिवसांच्या व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या अर्जावर न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून प्रत्यर्पण प्रक्रियेला गती मिळाली आहे. घायवळ टोळीवर यापूर्वी मकोका लागू करण्यात आला आहे. त्याचा व्हिसा फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूक आउट, रेड कॉर्नर आणि नुकतीच ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. दुसऱ्याच्या नावावरचे सिमकार्ड वापरणे, बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवणे यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता त्याची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू होऊ शकते, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.