प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीजवळ रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात महिलेला भरधाव पिकअपची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, शिक्रापूर पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला महामार्ग ओलांडत असताना अहिल्यानगरकडून भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ व्हीटी २४१४ या पिकअपची जोरदार धडक बसली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजय हनुमंत जाधव (वय २५, रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पिकअप चालक राहुल रामचंद्र यादव (वय २६, रा. येवलेवाडी कोंढवा, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरात शोध घेतला, मात्र अद्याप यश आले नाही.मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: रंग गोरा, लांब केस, डाव्या हाताच्या मनगटावर ‘AS’ आणि ‘बदाम’ चिन्ह तसेच हाताच्या मधल्या बोटावर ‘A’ अक्षर गोंदलेले आहे. अंगात लाल व पांढऱ्या रेषांचा टी-शर्ट आणि काळी पँट परिधान केलेली आहे. या वर्णनाच्या महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार गणेश कुदळे यांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.