प्रभात वृत्तसेवा खालापूर – शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेविकेचे पती मंगेश सदाशिव काळोखे (वय ४५, रा. साईबाबानगर, खोपोली) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २६) सकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास खोपोलीतील विहारी चौकात घडली. कुऱ्हाड, कोयता आणि तलवारीने डोक्यावर वार करून काळोखे यांची जागीच हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण खोपोली शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांचा विजय निश्चित झाला होता. मंगेश काळोखे हे सकाळी आपल्या मुलीला शिशुमंदिर शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना मारेकऱ्यांनी त्यांची मोटारसायकल अडवून धडक दिली. त्यानंतर त्यांनी काळोखे यांचा पाठलाग करून विहारी चौकात गाठले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक, कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी गर्दी केली. संतप्त महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी खोपोली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत महिलांनी जोरदार आक्रोश केला. संतप्त जमावाने दोन वेळा मुंबई-पुणे जुना महामार्ग अडवला, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खोपोलीतील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल या प्रकरणी मयत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण आणि अन्य तीन अनोळखी इसमांनी प्रत्यक्ष हल्ला केला असल्याचा आरोप आहे. तसेच रविंद्र परशुराम देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांनी खुनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात खून व शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तणाव लक्षात घेता पोलीस अधीक्षक आचल दलाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, गुप्तहेर शाखेचे निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. खोपोली शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.