प्रभात वृत्तसेवा ओतूर – बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी ही माहिती दिली.खामुंडी (ता. जुन्नर) येथील मारुती मनोहर कदम (वय ६१) यांनी १५ मे २०२५ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच गावात राहणारे विजय हरिदास फलके (वय ४०) आणि त्यांची पत्नी पूनम (वय ३४) यांनी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करून कदम यांना पोक्सो व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.या धमक्या देऊन त्यांनी तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. आरोपींनी कदम यांच्याकडून दीड कोटी रुपये, ५० लाख रुपयांचे तीन धनादेश घेतले होते आणि उर्वरित ५० लाख रुपयांची वारंवार मागणी करत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती-पत्नीने सत्र न्यायालय जुन्नर आणि त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आरोपी पती-पत्नीने सोमवारी (दि. २४) ओतूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी विजय हरिदास फलके याला अटक करून २५ नोव्हेंबर रोजी जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपी विजय फलके याने अशाच प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत का, याबाबत ओतूर पोलीस तपास करत आहेत.