शिरूर: शिरूर तालुका आणि परिसरात चोरट्यांनी फसवणुकीचा नवा फंडा अवलंबला असून, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांचे दागिने लुटल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. पुणे–नगर महामार्गावरील सरदवाडी आणि शिरूरमधील जोशीवाडी येथे सायंकाळच्या सुमारास या चोऱ्या झाल्या. पहिली घटना सरदवाडीतील न्हावरा फाटा येथे घडली. रोहिणी सरोदे या घरासमोर चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारत त्यांना संभाषणात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनी गंठण हिसकावून पोबारा केला. त्यानंतर काही वेळातच जोशीवाडी परिसरात रंजना मेंगवडे या महिलेलाही याच पद्धतीने लुटण्यात आले. दोन्ही घटनांत मिळून सुमारे चार तोळे दागिने चोरीला गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरूर पोलिसांनी घटनास्थळांचे पंचनामे केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलांनी अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी परिसरात रात्रगस्त वाढवण्याची मागणी केली आहे.